बलरामपूर:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Incident) येथील घटनेवरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या हिंसाचारावरून विरोधक केंद्रातील मोदी आणि युपीतील योगी सरकारवर निशाणा साधत आहेत. गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलाला अटक करण्यात आली असली, तरी विरोधक आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली असून, आशिष मिश्राचे अब्बाजानला हटवणार नाहीत, असे म्हटले आहे.
आशिष मिश्राच्या जागी कुणीतरी अतीक असता तर आतापर्यंत त्याच्या घरावरून बुल्डोजर फिरवला असता, असा दावा करत भाजपने कमळ हे चिन्ह बदलून थार जीप ठेवावे, अशी टीका केली आहे. लखीमपूर खेरी घटनेत गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे.
आशिषच्या अब्बाजानविरोधात कारवाई नाही?
पंतप्रधान मोदी आशिषच्या अब्बाजानला हटवणार नाही का? योगी आदित्यनाथ कारवाई करणार नाहीत का? उच्च जातीचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाहीए. आशिषच्या ऐवजी अतीक असता तर आतापर्यंत घरावर बुल्डोजर फिरवला गेला असता. योगी बाबाच्या बुल्डोजरवर लिहिलेय की, केवळ मुसलमानांची घरे तोडली जावीत, अशी खरमरीत टीका ओवेसी यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशात २७ टक्के मुस्लीम अंडर ट्रायल
उत्तर प्रदेशमधील २७ टक्के मुस्लिमांवर अंडर ट्रायल सुरु आहे. येथील १९ टक्के मुस्लिमांची इच्छा आहे की, त्यांचा कुणीतरी नेता हवा. मात्र, मुस्लिमांचा कुणीही नेता नाही. लखीमपूर येथे जे काही झाले, ते आदेशांशिवाय शक्य नाही. ही अचानक घडलेली घटना नाही. यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती, असा दावाही ओवेसी यांनी केला.
दरम्यान, लखीमपूर हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये भाजप कार्यकर्ते, एक चालक आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. या घटनेनंतर आतापर्यंत योगी सरकारने एकालाही अटक केलेली नाही. यावरून विरोधकांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, शेतकरी नेत्यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.