नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून उत्तरपूर्व दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात हिंसाचार उफाळून आला आहे. आतापर्यंत 22 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचाही समावेश असून, शेकडो जण रुग्णालयात दाखल आहेत. तर यावरूनच आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकीच्यावेळी दिल्लीत ठाण मांडून बसलेले गृहमंत्री अमित शाह हिंसेच्यावेळी कुठय? असा खोचक सवाल एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.
ओवेसी म्हणाले की, दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यालय असून तिथे ते का जात नाही. ज्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आणि मशीदवर हल्ला करण्यात आला, अशा ठिकाणची शहा यांनी पाहणी करणे अपेक्षित असताना ते का गेले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत चार-चार दिवस गृहमंत्री म्हणून ठाण मांडून बसलेले शहा आता कुठे आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी आज गृहमंत्री असल्याचा पुरावा द्यावा. दिल्लीतील हिंसाचाराला भाजप सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रीचं जवाबदार असल्याचं आरोप ओविसी यांनी केला. तसेच या घटनेत अनेकांचा मृत्य झाला असून त्यासाठी सुद्धा भाजप सरकार जवाबदार असल्याचही ते म्हणाले.