Asaduddin Owaisi News: लोकसभा निवडणुकीनंतर आता लोकसभा अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. नीट आणि नेट परीक्षांमधील पेपरफुटीवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. यातच खासदारकीची शपथ घेताना एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पॅलेस्टाइनच्या केलेल्या उल्लेखावरून एनडीए आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकाराची तक्रार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ओवेसी यांनी शपथ घेताच ‘जय पॅलेस्टाईन’ असा नारा दिला. याचा अनेकांनी निषेध केला. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाठराखण करत ओवेसी यांनी दिलेल्या नाऱ्यात गैर काय असा सवाल केला. यातच खासदार ओवेसी यांच्या घराबाहेरील नामफलकावर काळे फासण्यात आले. यावर ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केला. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सावरकरांप्रमाणे भ्याड वागणे सोडा, हिंमत असेल तर...
ओवेसी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ओवेसी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, माझ्या दिल्लीतील निवासस्थानाला काही अज्ञातांनी काळे फासले. दिल्लीतील माझे घर कितीवेळा टार्गेट केले गेले, याबाबत गणती विसरलो आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हा प्रकार घडला आहे. त्यांच्याकडे गेलो की, ते हतबलता व्यक्त करतात. अमित शाह तुमच्या निर्देशांनुसार, हे घडत आहे का? ओम बिर्लांनी हे स्पष्ट करावे की, दिल्लीत खासदार सुरक्षित नाहीत. दोन गुंड आहेत, ते माझ्या घरावर असे भ्याड हल्ले करतात. मात्र यामुळे घाबरणार नाही. सावरकरांप्रमाणे भ्याड वर्तन सोडा. हिंमत असेल, पुरुषासारखे माझ्यासमोर या. दगफेक करुन, काळे फासून पळून जाऊ नका, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ओवेसी यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी केली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईन असा नारा दिला. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब आहे, असेही नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.