नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शस्त्रपूजन व विजयादशमी समारंभात सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी अगदी ओटीटी प्लॅटफॉर्मपासून ते ड्रग्जपर्यंतच्या अनेक गोष्टींवर परखडपणे भाष्य करून केंद्र सरकारला काही सल्लेही दिले. विजयादशमी समारंभातील भाषणावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मोहन भागवत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांचे भाषण नेहमीप्रमाणे अर्धसत्य आणि खोटेपणाचे होते, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.
असदुद्दीने ओवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोहन भागवत यांच्या जनसंख्या नियंत्रण धोरण आणि अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या मतांवर आक्षेप नोंदवत टीकास्त्र सोडले आहे. मोहन भागवत यांचे भाषण नेहमीप्रमाणे अर्धसत्य आणि खोटेपणाचे होते. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मियांची संख्या वाढत असल्याचा मोहन भागवत यांचा दावा चुकीचा असून, मुस्लिमांची संख्या वाढत नसून झपाट्याने कमी होत चालली आहे, असा दावा ओवेसी यांनी केला आहे.
भागवत यांनी PM मोदींना याबाबत सांगितले पाहिजे
विवाह झालेल्या मुलांमध्ये ८४ टक्के हिंदूंचा समावेश आहे, असा दावा करत मोहन भागवत यांचे जनसंख्या वाढीचे परिमाण तथ्यहीन आहे. देशाच्या वाढत्या लोकसंख्येसह तरुण वर्गासमोर वाढत चाललेल्या समस्या आणि अडचणी मोठ्या आहेत. बेरोजगारी आणि महागाईमुळे त्यांच्या चिंतेत भर पडत चालली आहे. याबाबतही मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली पाहिजे, असा खोचक सल्ला ओवेसी यांनी दिला आहे.
दरम्यान, परदेशातून होणारी घुसखोरी व इतर कारणांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन निर्माण होत आहे. हे असंतुलन देशासाठी घातक ठरू शकते व अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. आगामी ५० वर्षांचा विचार करून लोकसंख्या धोरण तयार झाले पाहिजे व ते सर्वांसाठीच लागू करायला हवे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते.