Asaduddin Owaisi Nirmala Sitharaman: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओबामांवर टीका केली. त्यानंतर आता अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले आहे.
अमरावती येथील सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, "13 देशांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सर्वोच्च राज्य सन्मानांनी सन्मानित केले आहे. त्यापैकी सहा मुस्लिम बहुल देशांनी पंतप्रधान मोदींना हे पुरस्कार प्रदान केले आहेत. सौदी अरेबिया, यूएई, इजिप्त आणि इतर देशांचा समावेश आहे. पण, मला अर्थमंत्र्यांना सांगायचे आहे की, भारतातील मुस्लिमांचा सौदी अरेबियाच्या किंवा इजिपत्या किंवा यूएईच्या मुस्लिमांशी कोणथाही संबंध नाही. भारतातील 20 कोटी मुस्लिमांना इराण, UAE, इजिप्त, इराणच्या मुस्लिमांशी काय देणेघेणे."
ओवेसी पुढे म्हणाले, "आम्ही भारतीय मुस्लिम आहोत. तिकडे राजेशाही आहे, पण इथे आंबेडकरांनी बनवलेले संविधान आहे. तुम्ही भारतातील मुस्लिमांना त्या देशांशी जोडत आहात. आरएसएसचे लोक म्हणतात, ओवेसी, तुम्ही त्या देशा जा. त्यांना कोण सांगणार की, भारतात आमचे पूर्वज इंग्रजांविरुद्ध लढले, त्यांना फाशी देण्यात आली. त्यामुळे आम्ही 1947 मध्येच भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता."
तुम्ही अल्पसंख्याकांचे बजेट 40 टक्क्यांनी का कमी केले, तेव्हा तुम्हाला मुस्लिमांवरील प्रेम आठवले नाही का? मुस्लिमांची मुले ना फेलोशिप करू शकतात, ना पीएचडी करू शकतात. तुम्ही मदरसा योजनेतील 80 कोटी रुपये कमी केले. हे सर्व करताना मुस्लिमांवरील प्रेम आठवले नाही का? असा सवालही ओवेसी यांनी सीतारामन यांना विचारला.