Owaisi vs BJP: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अतिक्रमण हटवताना आग लागून आई-मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर निशाणा साधला. ओवेसी यांनी आई आणि मुलीच्या मृत्यूसाठी यूपी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, यूपीमध्ये बुलडोझरचे राजकारण करणाऱ्यांनी कानपूरमध्ये आई आणि मुलीची हत्या केली आहे. त्यांना राज्यघटनेने नव्हे तर बुलडोझर लावून सरकार चालवायचे आहे. कानपूर घटनेवर विरोधक हल्लाबोल करत आहेत आणि उत्तर प्रदेश सरकारवर सतत आरोप करत आहेत. त्यातच ओवेसींनी हा मुद्दा उपस्थित केला आणि कर्नाटक भाजपालाही लक्ष्य केले.
ओवेसींचा भाजपवर निशाणा
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी कर्नाटक भाजप अध्यक्षांवर निशाणा साधला. कर्नाटक भाजपा अध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी टिपू सुलतानचे गोडवे गाणाऱ्यांची कानउघाडणी केली होती. त्यावरून ओवेसींनी त्यांना डिवचले. "मी टिपू सुलतानचे नाव घेतोय, मी बघतो तुम्ही काय कराल", असे ओवेसी म्हणाले. "कर्नाटक भाजप अध्यक्षांच्या वक्तव्याशी पंतप्रधान सहमत आहेत का? कानपूरमध्ये झाला हा हिंसाचार, खून आणि नरसंहारासाठी खुले आवाहन आहे. कर्नाटक भाजपा अध्यक्षांनी जे विधान केले आहे, त्यावर त्यांचे सरकार काही कारवाई करणार नाही का? हा द्वेष पसवण्याचा प्रकार सुरू आहे का?" असे काही सवालही त्यांनी भाजपा सरकारपुढे उपस्थित केले होते.
कर्नाटक भाजप अध्यक्ष काय म्हणाले होते?
कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलिन मार कटील यांनी बुधवारी म्हटले होते, "आम्ही राम आणि हनुमानाचे भक्त आहोत. आम्ही टिपूचे वंशज नाही. आम्ही त्यांचे वंशज परत पाठवले. म्हणून मी येलबुर्गाच्या लोकांना विचारतो, ते हनुमानाची पूजा करतात की टिपूचे गोडवे गातात? मी बजरंग बलीच्या भूमीवरून सांगतो की टिपू सुलतानच्या चाहत्यांनी इथे राहू नये, इथून निघून जावे नाहीतर त्यांना काढून टाकले जाईल. जे भगवान श्री राम आणि हनुमानाचे भजन गातात त्यांनी इथेच थांबावे." यावरून ओवेसींचा पारा चढल्याचे दिसून आले.
तेलंगणा निवडणुकीबाबतही ओवेसींन भाजपावर निशाणा साधला. भाजपाला राजकीयदृष्ट्या तेलंगणामध्ये कोणताही फायदा होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ते 2023 मध्ये भाजपा अपयशी ठरेल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली.