नवी दिल्ली - भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असाच वाद ओढावून घेणारं विधान केलं आहे. गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झाली नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.
'प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच अभियानाला आव्हान दिले आहे. शौचालये साफ करण्यास त्यांनी नकार दिला. असं असेल तर देश न्यू इंडिया कसा होईल' अशा शब्दांत ओवैसी यांनी ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक प्रकारे खिल्ली उडवल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भारतातला जातीवाद कायम राहावा हीच त्यांची मनीषा असल्याचं देखील ओवैसी यांनी म्हटलं आहे. 'ठाकूर यांच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटत नाही किंवा मला धक्काही बसलेला नाही. कारण ते अशाच प्रकारचा विचार करतात. यावरुन त्यांचा देशातील जातीव्यवस्था आणि भेदभावावर विश्वास असल्याचे स्पष्ट होते' असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
मध्य प्रदेशातील सिहोर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक वादग्रस्त विधान केलं. 'आम्ही गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्यासाठी आम्हाला खासदार म्हणून जनतेनं निवडून दिलं आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू' असं म्हटलं आहे. ठाकूर यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका झाली होती.
खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी याआधी संसदेत मॉब लिंचिंगच्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरले होते. गृहमंत्री अमित शहा यांना अद्याप मॉब लिंचिंगवर कायदा का केला नाही?, मॉब लिंचिंगचा कायदा कधी अस्तित्वात येईल? असा प्रश्न असुदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा सभागृहात विचारला होता. ओवैसी यांनी अमित शहांना सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत, हा प्रश्न विचारला होता.