नवी दिल्ली: जागतिक टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यापासून अनेकविध प्रतिक्रिया उमटत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील नेते, क्रिकेट फॅन यावरून आमने-सामने येताना पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद (Sheikh Rashid) यांनी पाकिस्तान जिंकवा म्हणून भारतातील मुस्लिमांनीही प्रार्थना केली होती, असा दावा केला होता. यानंतर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शेख रशीद यांना चांगलेच सुनावले असून, एकीकडे आपला देश चीनकडे गहाण ठेवता आणि दुसरीकडे इस्लामच्या गोष्टी करता लाज वाटत नाही का, अशी चपराक लगावली आहे.
शेख रशीद यांनी भारत पाक सामन्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तानचा विजय इस्लामचा विजय असल्याचे म्हटले होते. यावर ओवेसी यांनी शेख रशीद यांना एका जाहीर सभेत बोलताना फटकारले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी क्रिकेट सामन्याशी इस्लामचा काय संबंध आहे, असा प्रश्न केला आहे.
इस्लामचा क्रिकेट सामन्यांशी काय संबंध?
आपल्या शेजारी देशाचा एक मंत्री वेडा आहे बिचारा. पाकिस्तानचा विजय हा इस्लामचा विजय असल्याचे ते म्हणाले. पण शेजारील देशांना काही कळत नाही. शेवटी इस्लामचा क्रिकेट सामन्यांशी काय संबंध? अल्लाचे आभार माना की आमचे वडील तिथे (पाकिस्तान) गेले नाहीत, नाहीतर आम्हाला या वेड्यांना बघावे लागले असते. एकीकडे आपला देश चीनकडे गहाण ठेवता आणि दुसरीकडे इस्लामच्या गोष्टी करता लाज वाटत नाही का, या शब्दांत ओवेसी यांनी शेख रशीद यांना चांगलेच सुनावले आहे.
भारत खूप पुढे गेला आहे, आमच्याशी पंगा घेऊ नका
पाकिस्तान स्वतःच्या देशात मलेरियाचे औषध बनवू शकत नाही. मोटारसायकलचे टायर बनवू शकत नाही. भारत खूप पुढे गेला आहे. भारत एक प्रगतीशील देश आहे. उगाचच आमच्याशी पंगा घ्यायला जाऊ नका, असा टोलाही ओवेसी यांनी लगावला आहे. आमच्या अंतर्गत मुद्द्यांबाबत पाकिस्तानच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. मोहम्मद शामीसारखा गोलंदाज पुन्हा शोधून सापडणार नाही, असे ओवेसी यांनी नमूद केले.
दरम्यान, पाकिस्तानच्या टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा. ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या टीमने शिकस्त दिली आहे, त्याला सलाम करतो. पाकिस्तानच्या टीम आणि मुस्लिम बांधवांनाही शुभेच्छा. भारतातील मुस्लीम बांधवांच्या प्रार्थनाही पाकिस्तानच्या टीमसोबत होत्या. केवळ भारतात नाही, तर जगभरातील मुस्लीम बांधव पाकिस्तानच्या टीमच्या पाठीशी होते, असे शेख रशीद यांनी म्हटले होते.