हैदराबाद: एआयएमआयएमचे(AIMIM) नेते आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी(Asaduddin Owaisi) यांनी आगामी टी-20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे 9 सैनिक शहीद झाले आणि दुसरीकडे मोदी सरकार 24 ऑक्टोबर रोजी क्रिकेट सामना खेळत आहे,'अशी टीका ओवैसी यांनी केली आहे. ते हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हणाले की, 'नरेंद्र मोदी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना म्हणाले होते, सैनिक मरत आहे आणि मनमोहन सिंग सरकार बिर्याणी खाऊ घालत आहे. आणि आता 9 सैनिक शहीद होतात आणि तुम्ही टी-20 खेळवणार? काश्मीरमध्ये पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी खेळत आहे,'असंही ओवैसी म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील हत्यांवर ओवैसी म्हणाले- 'काश्मीरमध्ये टार्गेट किलींग होत आहे. भारताच्या सीमा बंद केल्या तरी ड्रोनमधून शस्त्रे येत आहेत. इंटेलिजंस काय करत आहे? अमित शहा काय करत आहेत? 370 काढून टाकल्यानंतर काश्मीरमध्ये सर्व शांत होईल, असं वाटलं होतं. पण, असं काहीच झालं नाही. सीमेपलीकडून दहशतवादी येत आहेत.
सरकार पाकिस्तानच्या NSA शी बोलणार का?
ओवेसी पुढे म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये दररोज हत्या होत आहेत. आमचे सैनिक मारले जात आहेत. मग पाकिस्तानने NSA बरोबर चर्चा करण्याचा काय अर्थ आहे? जर तुम्ही खोऱ्यातील हत्या थांबवल्या नाहीत तर देशाच्या कानाकोपऱ्यात त्याची पुनरावृत्ती होईल. आता तुम्ही NSA बरोबर काय चर्चा कराल? भाजपकडे स्थिर परराष्ट्र धोरण नाही. अशा वातावरणात तुम्ही त्याच्याशी बोललात तर काय होईल? केंद्र सरकारची पाक सीमेवरील नियंत्रण रेषेसाठी काही योजना आहे का?, असे अनेक प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले.