नवी दिल्ली : बॉलिवूड चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' रिलीज झाल्यापासून चर्चेत आणि वादात आहे. एकीकडे अनेकांना हा चित्रपट आवडलतोय, काही राज्यांनी तर चित्रपट करमुक्त केला आहे. पण, दुसरीकडे अनेकांनी या चित्रपटाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी(AIMIM Asaduddin Owaisi) यांनीही या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'मुस्लिमांविरुद्ध द्वेष वाढतोय'एनडीटीव्हीशी बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ''चित्रपट पाहिल्यानंतर लोक मुस्लिमांविरोधात व्हिडिओ का बनवत आहेत? मुस्लिमांविरुद्ध द्वेष का वाढवला जातोय? सोशल मीडियावर असे कितीतरी व्हिडीओ आहेत, ज्यात कोणी सिनेमागृहात उभे राहून मुस्लिमांच्या विरोधात भाषण करत आहे, तर कोणी मुस्लिमांविरोधात काहीही बोलत आहे.''
'भाजपने इतक्या वर्षात काय केले'ते पुढे म्हणतात की, "काश्मीरमध्ये नक्कीच काश्मिरी पंडित मारले गेले. 209 लोक मारले गेले, माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे. पण डोग्रा भागातील जे 1500 हिंदू मारले गेले, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार? चित्रपट पाहून देशाच्या पंतप्रधानांना काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली, पण या हिंदूंच्या दुःखाची नाही. भाजप सात वर्षांपासून सत्तेत आहे, आतापर्यंत त्यांच्यासाठी काय केल?"
'त्या घटनेची चौकशी व्हायला हवी'ओवेसी पुढे म्हणाले की, ''मी लोकसभेत म्हणालो की, तुम्ही कमिशन ऑफ इन्क्वायरी कायद्यांतर्गत स्वतंत्र चौकशी आयोग करा, सत्य समोर येईल. त्या काळात किती काश्मिरी पंडित स्थलांतरित झाले आणि का झाले, हे चौकशीतून समोर येईल. तसेच, 16-17 जानेवारीपूर्वी नेमकं काय झालं, तेही समोर येईल. या सात वर्षांच्या सरकारने काश्मीरमध्ये किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन केले त्याची माहिती द्या," असेही ओवेसी म्हणाले.
'तेव्हा मुस्लिमांचा नरसंहार झाला'"तुम्ही काश्मिरींविरोधात द्वेष पसरवत आहात. आता नरसंहाराचा विषय निघालाच आहे, तर असाममध्ये 3-4 हजार मुस्लिमांनाही मारले गेले होते. मुरादाबादमध्ये काँग्रेसची सरकार असताना 500 पेक्षा जास्त मुस्लिमांना पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या, तो नरसंहार नव्हता का? त्यावरही चर्चा व्हायला हवी", असही ओवेसी म्हणाले.