नवी दिल्ली: सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. संसदेत बोलताना हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी अनेक प्रश्न मांडले 'सरकारला हिरव्या रंगाची इतकी अडचण का आहे? मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढू शकते का? पंतप्रधान मोदी चिनी घुसखोरीवर बोलतील का? बिल्कीस बानोला न्याय मिळेल का?' असे अनेक प्रश्न ओवेसींनी विचारले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये अल्पसंख्याक योजनांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी कमी केल्याबद्दल ओवेसी यांनी भाजप सरकारवर टीका केली.
'मुघल पैसे घेऊन पळून गेले का?'2023-24 या आर्थिक वर्षासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात 38 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. मुस्लिमांनी या देशात शिक्षण घ्यावं असं भाजप सरकारला वाटत नाही, असा आरोप ओवेसी यांनी केला. भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले, काँग्रेस आणि भाजपने भारतात कुलीनशाहीला जन्म दिला आहे. देशातून अमाप संपत्ती घेऊन पळून गेलेल्या लोकांच्या यादीत मुघलांचे नाव आहे का? पण भाजप यावर काहीच बोलणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
'हिंडेनबर्ग भारतात असता तर...'
ओवेसी पुढे म्हणतात, 'हिंडेनबर्ग भारतात असता तर त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याचा सामना करावा लागला असता.' ओवेसी पुढे म्हणाले की, 'मी विनंती करतो की, प्रार्थनास्थळ कायदा विसर्जित करू नये. पंतप्रधानांनी चीनला घाबरू नये आणि भारतातील अल्पसंख्याकांचे बजेट वाढवावे.'