नवी दिल्ली, दि. 28 - आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारलं आहे. आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप असून चार वर्षांपासून ते जेलमध्ये आहेत. मात्र अद्यापही पीडित महिलेची साक्ष घेण्यात आलेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत खटल्यात इतकी दिरंगाई का असा सवाल विचारला आहे. 'खटल्यात इतका उशीर का ? आतापर्यंत पीडित महिलेची साक्ष का घेण्यात आली नाही ?' असे सवाल सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विचारले आहेत. न्यायालयाने प्रगती अहवाल सादर करण्याच आदेशही दिला आहे.
76 वर्षीय आसाराम बापू यांच्यावर आश्रमात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ऑगस्ट 2013 पासून राजस्थान कारागृहात ते बंद आहेत. दोन महिन्यानंतर आसाराम बापू आणि त्यांच्या मुलगा नारायण साई यांच्यावर सुरतमधील आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधीनगरमधील न्यायालयात खटला प्रलंबित आहे.
सर्वोच्च न्यायालयात आसाराम बापू यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गुजरात सरकारने आसाराम बापूंमुळेच खटल्याला उशीर होत असल्याची माहिती दिली आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरोप करणा-या पीडित महिला आणि इतर साक्षीदारांचा जबाब तात्काळ नोंदवण्याचा आदेश दिला होता. जवळपास 40 साक्षीदार असून अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.
'उगाच रेंगाळत राहू नका, हेच आम्हाला सांगायचं आहे. लवकरात लवकर पुरावे सादर करा', असं न्यायाधीशांनी एप्रिल महिन्यात सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूंना जामीन देण्यास नकार दिला आहे. आसाराम बापू यांनी अनेकदा आपल्या तब्बेतीचं कारण देत जामीन देण्याचा अर्ज केला आहे.
आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा जेलमध्ये असताना सहा साक्षीदारांवर हल्ला झाला असून त्यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. 2002 मध्ये त्याच्या दोन अनुयायांनी बलात्काराचा आरोप केला होता. अखेर 15 वर्षांनी पंचकुला सीबीआय विशेष न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने दोषी ठरवताच समर्थकांनी हिंसाचर करत जाळपोळ आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली होती. हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.