अल्पवीयन मुली आणि महिलांवर केलेल्या बलात्कार प्रकरणार जन्मठेप भोगत असलेला वादग्रस्त साधू आसाराम बापू याला सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत वैद्यकीय कारणांसाठी जामीन मंजूर केला आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर आसाराम बापू इंदूर येथील आश्रमात पोहोचला असून, येथे तो अनुयायांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच त्याचे अनुयायीही त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आश्रमात पोहोचत आहेत.
आसाराम बापूचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये तो सामूहिकपणे भक्तांशी संवाद साधताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आसाराम बापू तपासणीसाठी रुग्णालयात गेला होता. तिथे काही अनुयायांनी त्याला आरती ओवाळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आसाराम वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेला असताना हा व्हिडीओ काढण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, इंदूरच्या ज्या आश्रमामध्ये आसाराम बापू प्रवचन देत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याच आश्रमात आसाराम बापूवर अटकेची कारवाई झाली होती. कोर्टाने आसाराम बापूवर कुणाचीही भेट घेण्यास आणि प्रवचन देण्यास बंदी घातली होती. मात्र समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लोकांच्या भेटीगाठी घेऊन आणि प्रवचन देऊन आसाराम बापू हा कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जामिनावर सुटलेला आसाराम बापू आपल्या आश्रमात प्रवचन देत असल्याचा दावा केला जात आहे.