जोधपूर : लैंगिक अत्याचारप्रकरणी पाच वर्षे पोलीस कोठडीत असलेला स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला बुधवारी जोधपूर न्यायालय शिक्षा सुनावणार असल्याने संपूर्ण राजस्थानमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, काही ठिकाणी आतापासूनच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय हरयाणा, गुजरात, दिल्ली तसेच मध्य प्रदेशातही अॅलर्टचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याला शिक्षा सुनावली गेल्यास काही ठिकाणी हिंसाचार सुरू होईल, या शक्यता आहे. जोधपूरमध्येही १४४ कलम लागू करण्यात आले असून, स्वत: आसाराम बापूने आपल्या भक्तांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. बाबा राम रहिमला शिक्षा झाल्यानंतर चंदीगड व पंचकुला भागात त्याच्या समर्थकांनी प्रचंड हिंसाचार केला होता. तसे यावेळी होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. आसारामच्या सर्व आश्रमांवरही लक्ष ठेवण्यात येत असून, कुठेही गर्दी दिसताच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
काय आहे प्रकरण?इंदूरमधील मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा खटला जोधपूर न्यायालयात सुरू होता. त्याचा निकाल उद्या लागेल, असा अंदाज आहे. कदाचित शिक्षेबाबत केवळ सुनावणी होईल आणि नंतर शिक्षा सुनावली जाईल. ज्या मुलीवर अत्याचार झाले होते, तिला याआधीच पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या खटल्यातील तीन साक्षीदारांची हत्या झाल्याने निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निर्दोष ठरले तरीही सुटका होणे नाहीचया खटल्यात पुराव्याअभावी आसाराम बापू निर्दोष ठरला तरी तो तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही. त्याला तुरुंगातच राहावे लागेल. त्याच्याविरोधात गुजरातमधील बलात्काराचा खटलाही सुरू आहे. आसाराम बापूचा मुलगा नारायण साई हाही बलात्काराच्या खटल्यात तुरुंगात आहे. नारायण साई याच्याकडे ५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समजते.