जोधपूर- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जोधपूर मध्यवर्ती विशेष कोर्टाने आसाराम बापूला दोषी ठरवलं आहे. कोर्टाने आसाराम बापूला दोषी ठरविल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत कोर्टाचे व माध्यमांचे आभार मानले आहेत. आसाराम बापूला दोषी ठरविल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे. आता त्याला कडक शिक्षा होईल अशी आम्हाला आशा आहे. या शिक्षेद्वारे या प्रकरणातील ज्या साक्षीदारांची हत्या झाली तसंच जे बेपत्ता आहेत त्यांना न्याय मिळावा ही इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे.
31 ऑगस्ट 2013 पासून आसाराम बापू जोधपूर तुरुंगात आहे. उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील असलेल्या आणि आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरजवळ असलेल्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केाल होता. मुलीच्या तक्रारीनंतर आसारामला इंदूरहून अटक करण्यात आली होती. इंदूरहून अटक झाल्यानंतर 1 सप्टेंबर 2013 रोजी जोधपूरला आणण्यात आलं. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
आसाराम बापूचं वय सध्या 77 आहे. पॉक्सो व अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत आसाराम बापूवर गुन्हे दाखल आहे. तुरुंगात गेल्यापासून त्याने 12वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. पण आसारामला जामीन मिळाला नाही. 12 पैकी सहा जामीन अर्ज ट्रायल कोर्टाने फेटाळले, तीन अर्ज राजस्थान हाय कोर्टाने फेटाळले आणि तीन सुप्रीम कोर्टाने फेटाळले होते.