हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर आक्रमण करत बॉम्बचा वर्षाव केलाय. इस्रायलच्या प्रत्त्युत्तरात आत्तापर्यंत २२०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने गाझाची वीज तोडली आहे. पाणी कधीही संपू शकते, अशी स्थिती आहे. आतापर्यंत ४ लाखांहून अधिक जणांनी गाझा सोडले आहे. गाझामधील २० लाख लोकांचे जीव धोक्यात आहेत, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. इस्रायल आणि हमासच्या वादात गाझा पट्टीतील नागरिक आणि पॅलेस्टाइनच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यावरुनच, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केलं आहे.
गाझा सिटी खाली करण्यासाठी इस्रायलने शनिवारी दुपारी चारपर्यंत दिलेली मुदत संपली आहे. गाझाच्या सीमेवर इस्रायलने मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात केले आहेत. नागरिक मिळेल त्या मार्गाने गाझा सोडण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे, असदुद्दीन औवेसी यांनी गाझा पट्टीवरील नागरिकांना मदत करण्याचं आवाहन मोदींना केलंय. हैदराबादमधील एका सभेला संबोधित करताना औवेसी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना राक्षस आणि युद्धाला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, गाझी पट्टीतील नागरिकांसाठी भारताने एकजुटता दाखवावी, भारताने येथील लोकांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलंय.
हमासचा कंमाडर अली कादी मारला गेला
काही दिवसांपूर्वी इस्रायलवर हल्ला करणारा हमासचा कमांडर अली कादीला इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला. हमासच्या एअरफोर्सचा प्रमुख मुराद अबू मुराद हा सुद्धा इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये ठार झाला आहे.