- राजेंद्र कुमारनवी दिल्ली : नोकरदार आणि राजकारण यांचे नाते तसे जुने आहे. नोकरीत असताना नेत्यांचे डोळे, कान आणि नाक हे अधिकारीच असतात. आता तर राजकारणातही माजी अधिकाऱ्यांचा दबदबा वाढला आहे. कानपूरचे पहिले पोलीस आयुक्त राहिलेले आयपीएस अधिकारी असीम अरुण हे रविवारी भाजपमध्ये दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत ते पक्षात दाखल झाले. ईडीचे संयुक्त संचालक राहिलेले राजेश्वर सिंह हेही लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. याशिवाय, समाजवादी पार्टीचे दोन विधान परिषद सदस्य शैलेंद्र प्रताप सिंह आणि घनश्याम लोधी, माजी आमदार ओमप्रकाश वर्मा व माजी आयएएस अधिकारी राम बहादूर यांनीही रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. असीम अरुण यांनी गत ८ जानेवारी रोजी व्हीआरएससाठी अर्ज दिलेला आहे. राज्य सरकारने १५ जानेवारी रोजीच हा अर्ज स्वीकार केला. १९९४ च्या बॅचचे आयपीएस असीम अरुण यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज देताना सांगितले होते की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरून आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. असीम यांचे वडील श्रीराम अरुण हे डीजीपी होते. असीम यांच्या नोकरीचे सात वर्षे अद्याप बाकी आहेत. तेही वडिलांप्रमाणे डीजीपी बनले असते. भाजपा कन्नोजमधून त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकते. नोकरदारांचे भाजप प्रेम आहे जुने ज्येष्ठ पत्रकार गिरीश पांडेय यांनी सांगितले की, देशात आणि राज्यात नोकरदार आणि भाजपा यांचे प्रेम तसे जुने आहे. जनसंघाच्या काळापासून हे चालत आलेले आहे. १९६७ मध्ये फैजाबादेत जिल्हाधिकारी राहिलेले के. के. नायर हे जनसंघाच्या तिकिटावर बहराइचमधून लोकसभेत पोहोचले होते. डीजीपी राहिलेले श्रीशचंद्र दीक्षित अगोदर भाजपमध्ये आले. नंतर विहिंपमध्ये गेले. राम मंदिर आंदोलनातही ते होते. विहिंपचे नेते अशोक सिंघल यांचे भाऊ बी. पी. सिंघल, डीजीपी राहिलेले राज्यसभा सदस्य ब्रजलाल, निवृत्त आयपीएस सूर्यकुमार शुक्ला, निवृत्त आयएएस व विधान परिषद सदस्य अरविंद कुमार शर्मा, माजी रेल्वे अधिकारी आमदार देवमणी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासारखे अनेक नेते भाजपमध्ये आहेत. पांडेय म्हणतात की, भाजपचे नेतृत्व नोकरदारांवर खूप विश्वास ठेवत आलेले आहे.
Uttar Pradesh Assembly Election: आयपीएस असीम अरुण, सपाचे २ आमदार भाजपमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 6:17 AM