- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आपल्या सुमधुर आवाजाने सहा दशके संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सदाबहार गायिका आशा भोसले यांचा दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात मेणाचा पुतळा तयार करण्यात येणार आहे. जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयाची येथे शाखा उभारण्यात आली असून, आशाजींचा तिथे तयार करण्यात येणार पुतळा संग्रहालयाच्या बॉलिवूड संगीत विभागाची शोभा वाढवणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आशाजींचा अशा प्रकारचा हा पहिलाच पुतळा असेल. तो १५० मोजमापे आणि छायाचित्रांच्या मदतीने साकारण्यात येणार आहे. ही माझ्यासाठी अतिशय गौरवाची बाब असून, मला रोमांचक वाटत आहे. मेणाचा पुतळा तयार करणे आनंददायी अनुभव असून, माझ्यासाठी एकदम नवा अनुभव आहे. मी माझा पुतळा पाहण्यास अधीर झाले आहे, अशी प्रतिक्रिया ८३ वर्षांच्या आशा भोसले यांनी व्यक्त केली. आशाजी या महान गायिका आहेत. त्यामुळे दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात त्यांचा मेणाचा पुतळा असणार हे निश्चित होते. सर्व पिढ्यांमध्ये त्यांचे चाहते आहेत. संगीत क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानामुळे त्या सर्वांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत, असे मर्लिन एंटरटेनमेंट्स इंडियाचे संचालक आणि व्यवस्थापक अंशूल जैन यांनी सांगितले.दिग्गजांचे ५0 पुतळे मर्लीन एंटरटेनमेंट्स व्यवस्थापन पाहत असलेल्या दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात क्रीडा, चित्रपट, राजकारण, इतिहास आणि संगीत जगतातील ५० दिग्गजांचे मेणाचे पुतळे ठेवण्यात येणार आहेत. आशाजींनी शेकडो बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायली असून, भारतीय आणि परदेशी अशा २० भाषांत त्यांची हजारो गाणी आहेत.