नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटातही आषाढी एकादशीचा उत्साह घराघरात दिसून येत आहे. देशावरील कोरोनाचं संकट लवकर जाऊ दे, पुन्हा एकदा आम्हाला गजबलेलं पंढरपूर पाहू दे... अशीच प्रार्थना लाखो वारकऱ्यांनी आज विठु-माऊलीकडे घरातूनच केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सपत्नीक पहाटे 2.30 वाजता शासकीय विठ्ठल पूजा केली. त्यावेळीही, बा विठ्ठला, कोरोनाचं संकट दूर कर, अशीच प्रार्थना केली. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे, असेही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच प्रादेशिक अस्मिता जपतात. देशातील नागरिकांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या शब्दात आपुलकीने आपलसं करण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी आणि वारकऱ्यांची शिकवण मोदींनी जगाला सांगितली आहे.
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सपत्नीक विठ्ठलाची पूजा
आषाढी एकादशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. त्यावेळी, आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला... पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर...आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात केली.
सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरात आल्यानंतर फक्त विठ्ठल रुक्मिणी मूर्तीकडेच आपण पाहत असतो, परंतु मंदिरातील प्रत्येक खांब, प्रत्येक दगड काहीना काहीतरी बोलत असतो. आज मी परंपरेचा वृक्ष लावला. त्यांची पायेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील असा विश्वास ही ठाकरे यांनी व्यक्त केला.