जयपूर : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी विधानसभेत जुनेच अर्थसंकल्पीय भाषण वाचून दाखवले. काही वेळ ते जुने बजेट वाचत राहिले, त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीतरी सांगितले आणि त्यांना धक्काच बसला. गेहलोत यांचे भाषण थांबताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. भारतीय संसदीय इतिहासात असे प्रथमच घडले.
गेहलोत यांनी शुक्रवारी विविध मंडळे, महामंडळे, अकादमी व विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेंतर्गत लाभ देण्याची घोषणा केली. गेहलोत यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची घोषणा केली होती. ‘चिरंजीवी’ या गरीब कुटुंबांसाठी असलेल्या आरोग्य विम्याची रक्कम १० लाखांवरून वार्षिक २५ लाख रुपये करण्याची घोषणाही त्यांनी केली.
जुन्या पेन्शन योजनेचा राजस्थानातील एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा- जोरदार गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दोनदा थांबवावे लागले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव उषा शर्मा यांना बोलावून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. - सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिले की अर्थसंकल्पीय भाषणाच्या प्रतीत चुकून जास्तीची पाने लागली. मी एक पृष्ठ चुकीचे वाचले.
राजस्थानला काय मिळाले?- गरिबांना ५०० रुपयांत सिलिंडर- घरगुती वीज ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज- वृद्धांसाठी मासिक पेन्शन १० हजार रुपये- ५० लाखांपर्यंत फ्लॅट खरेदीवर स्टॅम्प ड्युटीवर २ टक्के सवलत- संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये प्रति महिना- भरतीसाठीचे परीक्षा शुल्क माफ