नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या कोरोना संकट काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठी परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून गेल्या मे महिन्यात २० लाख कोटींचे 'आत्मनिर्भर भारत' आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले.
या पॅकेजबाबतची विस्तृत माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण दिली होती. मात्र, या पॅकेजवर विविध स्तरांतून टीका होत आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषद सदस्य आशिमा गोयल यांनीही या आत्मनिर्भर पॅकेजवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच, या पॅकेजमध्ये आणखी सुधारणा केली जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
'पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'च्या एका व्हर्च्युअल बैठकीत आशिमा गोयल बोलत होत्या. यावेळी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मागणीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. 'आर्थिक पॅकेज परिपूर्ण नाही. पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या दूर करून या पॅकेजमध्ये आणखी सुधारणा करता येऊ शकते', असे आशिमा गोयल यांनी म्हटले आहे.
याशिवाय, अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन गरजेचे असल्याचे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या पार्ट टाईम सदस्य असलेल्या आशिमा गोयल यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर, कोविड १९ चे संकट हे अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा पण तात्पुरता धक्का आहे. 'ह्युमन कॅपिटल' सुस्थितीत असेल तर अशा धक्क्यानंतर तेजीने सुधारणा पाहायला मिळते, असे आशिमा गोयल म्हणाल्या. तसेच, परकीय चलन साठा वाढवण्यासाठी परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत पहिल्या १४ दिवसांत आपत्कालीन पत सुविधा हमी योजना अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) १२,२०० कोटी रुपयांचे कर्ज वाटल्याचे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शनिवारी सांगितले आहे.
आणखी बातम्या...
पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार, स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद, निवृत्त महिला पोलीस निरीक्षकाकडून 1.10 कोटी रुपयांचा निधी