ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते प्रशांत भूषण यांनी आपवर पलटवार केला असून आपचे नेते आशिष खेतान यांनी २ जी घोटाळ्यात एस्सार कंपनीच्या समर्थनार्थ एक लेख लिहील्याचा गंभीर आरोप केला आहे. या लेखातून तहलका या मासिकाला तब्बल तीन कोटी रुपयांची देणगी मिळाली असा दावाही त्यांनी केला आहे.
आम आदमी पक्षाच्या शिस्त पालन समितीने आपचे बंडखोर नेते प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यानंतर सोमवारी प्रशांत भूषण यांनी आपवर पलटवार करत शिस्तपालन समितीच्या सदस्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २ जी घोटाळ्यात एस्सार कंपनीच्या समर्थनार्थ आशिष खेतान यांनी तहलकामध्ये लेख लिहीला होता, हा लेख सलमान खुर्शीद यांच्या सांगण्यावरुन लिहीण्यात आला होता, या लेखाच्या मोबदल्यात तहलकाला थिंकफेस्टसाठी ३ कोटी रुपये मिळाले असा गंभीर आरोप भूषण यांनी केला आङे. या शिवाय पक्षाचे नेते पंकज गुप्ता यांनीदेखील संशयास्पद कंपन्यांकडून दोन कोटी रुपयांची देणगी स्वीकारला असा दावाही त्यांनी केला आहे. अशा या वादग्रस्त नेत्यांचा समावेश शिस्तपालन समितीत करुन ते न्याय कसा करु शकतील असा सवालच त्यांनी उपस्थित केला.
तर आशिष खेतान हे इमानदार पत्रकार असून प्रशांत भूषण यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी जाहीर करावे असे सांगत आप नेते आशुतोष यांनी खेतान यांचा बचाव केला आहे.