नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर पत्रकार आशिष खेतान यांनी 'आप'च्या पदाचा काही खासगी कारणांसाठी राजीनामा दिला आहे. खेतान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे 15 ऑगस्ट रोजी ई-मेलच्या माध्यमातून राजीनामा सुपूर्द केला आहे.
'आप'चे नेते खेतान यांनी वकिलीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राजकारणापासून थोडं दूर होत आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे. खेतान हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात. याआधीही खेतान यांनी दिल्ली डेव्हलपमेंट कमिशनच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची या कमिशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष खेतान यांना नवी दिल्ली लोकसभा जागेसाठी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र पक्ष या निवडणुकीसाठी एका नव्या चेहऱ्याला संधी देणार आहे. यामुळेच नाराज झालेल्या खेतान यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे.