जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणुकीच्या वर्षात मोठी घोषणा केली आहे. राजस्थानमध्ये 19 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात आधीच 33 जिल्हे होते. आता राजस्थानमध्ये एकूण 50 जिल्हे होणार आहेत. दरम्यान, नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी गेल्या अनेक दशकांपासून होत होती. याशिवाय, राजस्थानमध्ये तीन नवीन विभाग निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आता राज्यात 10 विभाग होणार आहेत.
राजस्थान विधानसभेत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, जयपूर उत्तर, जयपूर दक्षिण, जोधपूर पूर्व, जोधपूर पश्चिम, कोटपुतली, बेहरोर, डिडवाना, दुदू, सांचोर, डीग, शाहपुरा, केकडी, सलुंबर, अनुपगड, बेवार, बालोतरा, गंगापूर सिटी, फलोदी, खैरथल, नीमकथाना, ब्यावर हे नवीन जिल्हे होणार आहेत. त्याचबरोबर, बांसवाडा, सीकर आणि पाली येथे नवीन विभाग तयार केले जातील.
राजस्थानमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी गेल्या दोन दशकांपासून होत होती. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आणि आमदार नवीन जिल्ह्यांची मागणी करत होते. अशोक गेहलोत यांनी मागणी होत असलेल्या जवळपास सर्वच क्षेत्रांना जिल्हा करण्याची घोषणा केली. दरम्यान, राजस्थानमधील जिल्ह्यांची मागणी ही मोठी राजकीय मागणी आहे.