नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री म्हणून खा. सचिन पायलट यांची नावे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी नक्की केली. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची माळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बाघेल यांच्याच गळ्यात पडली आहे. या तिघांच्या नावांची घोषणा शुक्रवारी दिल्लीत करण्यात आली.याबाबत दिवसभर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी चर्चा सुरू होती. त्यानंतर, दुपारी राजस्थानसाठीचे काँग्रेसचे निरीक्षक खा. के. सी. वेणुगोपाळ यांनी गेहलोत व पायलट यांच्या नावाची घोषणा केली. त्या वेळी हे दोघेही उपस्थित होते. गेहलोत यापूर्वी दोनदा राज्याचे मुख्यमंत्री होते. ते ६७ वर्षांचे असून, ओबीसी समाजात त्यांना स्थान आहे.पायलट खासदार असून, यापूर्वी २00४ सालीही निवडून आले होते. गुज्जर समाजाचे पायलट उच्च विद्याविभूषित असून, ते ४१ वर्षांचे आहेत. सध्या ते राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष असून, त्यांचे वडील राजेश पायलट हेही काँग्रेसचे नेते होते. भूपेश बाघेल हे छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्ष असून, ते ५७ वर्षांचे आहेत. छत्तीसगडची स्थापना होण्याआधी ते मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळातही होते.राहुल गांधी उपस्थित राहणारअशोक गेहलोत, कमलनाथ व भूपेश बाघेल या तिघांचा शपथविधी सोमवारी होणार आहे. कमलनाथ यांचा शपथविधी भोपाळमध्ये सकाळी साडेदहा वाजता, जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांचा शपथविधी दुपारी दीड वाजता आणि रायपूरमध्ये भूपेश बाघेल यांचा शपथविधी दुपारी साडेचार वाजता होणार आहे. या तिन्ही ठिकाणी राहुल गांधी हजर राहणार असून, कदाचित, सोनिया गांधीही उपस्थित राहतील.
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्री; छत्तीसगडची धुरा भूपेश बाघेल यांच्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 6:33 AM