ज्यांच्यामुळे राजस्थानात रणकंदण माजले, ते गेहलोतच काँग्रेस अध्यक्ष पदाच्या रेसमधून बाहेर? मोठा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 05:33 PM2022-09-26T17:33:55+5:302022-09-26T17:34:27+5:30
Ashok Gehlot News: राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही काळापासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्ष होण्यावरून राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून गुढग्याला बाशिंग बांधून बसलेले सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करू नये यासाठी गेहलोत यांच्या ९० हून अधिक समर्थक आमदारांनी राजीनामे दिले होते. तर स्वत: गेहलोत यांनीच पायलट यांच्या नावाला काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडे संमती दर्शविली होती. असे असताना आता नवा ट्विस्ट समोर आला आहे.
राजस्थानमधील सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेस हायकमांड अशोक गेहलोत यांच्या नावावर फुली मारण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रेसमधून बाहेर पडू शकतात. आज दिल्लीच्या १० जनपथ येथे बैठक होणार आहे. त्यापूर्वीच मोठी माहिती समोर येत आहे. केरळपासून जयपूरपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकाच स्वरात बोलू लागले आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत बाहेर पडल्याचे हे नेते बोलत आहेत. याचबरोबर ३० सप्टेंबरच्या आधी जे नेते निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतील त्यांनाही बाहेर केले जाणार आहे. यामुळे मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल यांची नावे चर्चेत आहेत. गेहलोत ज्या पद्धतीने वागले ते पक्ष नेतृत्वाला आवडलेले नाहीय. यामुळे हायकमांडच्या अडचणी वाढल्या आहेत, असे सीडब्ल्यूसी सदस्य आणि पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.
राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केके वेणुगोपाल 10 जनपथवर पोहोचले आहेत. राजस्थानचे निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही बैठकीला हजेरी लावली आहे. राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामेश्वर दुडी हेही 10 जनपथवर आले आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे.