राजस्थानात 2023 ची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात लढवली जाणार की नाही, यासंदर्भा आपण पुढील 60 दिवसांच्या आत निर्णय घेणार आहोत, असे काँग्रेसने म्हटले आहे. पक्ष नेतृत्वानुसार, पंजाबमध्ये अशा प्रकारचा निर्णय फार उशिराने घेण्यात आला. मात्र, आता तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ देण्याची पक्षाची इच्छा नाही.
यामुळे आता, काँग्रेस अशोक गेहलोत अथवा सचिन पायलट यांच्या नेतृत्वात निवडणूक रिंगणात उतरणार, की सामूहिक नेतृत्वाचा फॉर्म्युला वापरणार, हे लवकरच निश्चित होणार आहे. 10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर, हे स्पष्ट होईल.
योग्य प्रकारे निवडणुकीची तयारी करण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे भ्रामक वातावरण राहायला नको. जर अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात निवडणूक लढायची असेल, तर तेही स्पष्ट व्हायला हवे आणि नेतृत्व बदलायचे असेल, तर तेही वेळेपूर्वीच घोषित व्हायरल हवे. असे पक्षाचे मत आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रदेश प्रभारी अजय माकन आणि इतर काही नेत्यांशी चर्चा करून, पंजाबप्रमाणे कुठलाही बदल करावा लागू नये, यासाठी अंतिम निर्णय राज्यसभा निवडणुकीनंतर घेतला जाईल, असे ठरवले आहे.