2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठी या जागेची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा बालेकिल्ला मानली जाणारी ही जागा आता भाजपाकडे आहे आणि स्मृती इराणी येथून खासदार आहेत. त्याचवेळी, यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीतून पुन्हा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडने स्मृती इराणी यांच्या विरोधात केएल शर्मा यांना उमेदवार म्हणून घोषित केलं आणि राहुल गांधी यांच्यासाठी रायबरेलीची जागा निवडण्यात आली. तेव्हापासून भाजपा सातत्याने विरोधी पक्षावर हल्लाबोल करत आहे राहुल गांधींना स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवायची नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आता या प्रश्नाचे उत्तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी दिले आहे. "केएल शर्मा हे 40 वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. राहुल गांधींनी अमेठीला का जावे, ज्याची गरज नाही... हा पक्षाचा निर्णय आहे. कारण तिथे फक्त केएल शर्माच त्यांच्याशी (भाजपा) सामना करू शकतात. गांधी परिवाराच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस काम करणाऱ्या व्यक्तीने उमेदवार व्हावं यापेक्षा चांगलं काय असू शकतं."
"राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. ते रायबरेलीच्या जागेवरूनही विजयी होतील. इथे (अमेठीत) फक्त केएल शर्माच विरोधकांशी सामना करतील. जनताच म्हणत आहे की त्यांना असा कार्यकर्ता मिळाला जो त्यांचं ऐकतो, आवाज उठवतो आणि त्यांच्यासाठी काम करतो, आजपर्यंत जनतेचे मत दिल्लीत पोहोचले नाही, परंतु केएल शर्मा सक्रिय झाल्यानंतर लोकांचं ऐकले जात आहे" असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.
केएल शर्मा यांच्याबाबत अशोक गेहलोत म्हणाले की, "ते आधीपासून काम करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते सक्रिय आहेत आणि सोनिया गांधी यांनाही त्यांचे काम माहीत आहे. कोणीही निवडणूक लढवली असेल, मग ते सतीश शर्मा असोत, राहुल गांधी असोत की सोनिया गांधी असोत, प्रत्येकाला केएल शर्मा यांचे काम पाहिले आहे आणि मला माहित आहे की अमेठीच्या लोकांच्या समस्या देखील जाणून आहेत, त्यांच्याकडे लोकांसाठी प्लॅन आहे."