जयपूर : या वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. निवडणुकीच्या अवघ्या 6 महिन्यांपूर्वी पायलट यांनी आपल्याच सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. रविवारी जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सचिन पायलट यांनी सीएम गेहलोत यांच्यावर मागील वसुंधरा राजे सरकारच्या काळात उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला. तसेच, 11 एप्रिल रोजी एक दिवसाची उपोषण करण्याची घोषणाही केली आहे.
कशामुळे वाद पेटला?पायलट म्हणाले की, केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सीचा गैरवापर करत आहे आणि आमच्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई केली जात आहे, परंतु राजस्थानमध्ये आमचे सरकार एजन्सीचा कोणताही वापर करत नाही. राजस्थानमध्ये 2018 च्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली होती, परंतु आमचे सरकार सत्तेत आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. यावरुन लोक वसुंधरा राजे आणि गेहलोत यांच्यात काही मिलीभगत असल्याचे म्हणू शकतात, असे पालयट म्हणाले.
'माझ्या दोन पत्रांची उत्तरं मिळाली नाही'पायलट पुढे म्हणाले की, 2013 मध्ये काँग्रेसचे सरकार होते, पण निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर मी प्रदेशाध्यक्ष झालो, 5 वर्षे वसुंधरा सरकारचा विरोध केला आणि 2018 मध्ये त्यांचा पराभव केला. आम्ही जनतेला विश्वास दिला होता की, वसुंधरा सरकारमधील भ्रष्टाचाराची आम्ही चौकशी करुन दोषींना शिक्षा देऊ, परंतु असे काहीही झाले नाही. मी वसुंधरा सरकारच्या प्रकरणांवर सीएम गेहलोत यांना दोन पत्रे लिहिली होती, ज्यामध्ये मी त्यांना आरोपांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण गेहलोत यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
'गेहलोत यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ दाखवला'यावेळी पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्या जुन्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ देखील दाखवले, ज्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः वसुंधरा सरकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख करत आहेत. निवडणुकीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच खान महाघोटाळा, कोळसा घोटाळा यासारख्या अनेक घोटाळ्यांचे आरोप भाजप सरकारवर केले होते आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास या प्रकरणाची चौकशी करू असे सांगितले होते. बेकायदेशीर उत्खनन, खडी माफिया, दारू माफिया या प्रकरणी अद्यापपर्यंत तपास झाला नसून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पायलट यांनी सांगितले.
'पायलटचे सरकारविरोधात उपोषण'पायलट पुढे म्हणाले की, मी आमच्या सरकारवर आरोप करत नाही, मला फक्त या गोष्टी सार्वजनिक करायच्या होत्या. मी हा मुद्दा आज मांडत नाही, पण सरकारला साडेतीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी करायला सुरुवात केली आणि आज काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्यांना हे कळावे अशी माझी इच्छा आहे.