अशोक गेहलोतच राहणार राजस्थानचे मुख्यमंत्री; तूर्तास राज्यात निरीक्षक जाणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 10:34 AM2022-10-04T10:34:51+5:302022-10-04T10:36:01+5:30
राजस्थानात सध्या तरी मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तसे संकेत दिले आहेत.
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली:राजस्थानात सध्या तरी मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तसे संकेत दिले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे की, सध्या कोणीही निरीक्षक आमदारांचे मत घेण्यासाठी जयपूरला पाठविण्यात येणार नाहीत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन ज्या दिवशी माफी मागितली होती त्यानंतर काही तासांतच संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी असे विधान केले होते की, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय सोनिया गांधी दोन दिवसांत घेतील. आता सोनिया गांधी यांनीच राजस्थानचे सरचिटणीस प्रभारी अजय माकन यांना निर्देश दिले आहेत की, राज्यातील पूर्ण प्रकरण शांत करण्यात यावे. आमदारांमध्ये हा संदेश द्यायचा आहे की, कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. यामागचे कारण असे आहे की, काँग्रेस नेतृत्वाला याबाबत असा अहवाल मिळाला आहे की, जर अशोक गेहलोत यांना हटविण्याचा प्रयत्न झाला तर तेथील सरकार पडू शकते.
पंजाबमधील पराभवासाठी काँग्रेस नेतृत्वाला जबाबदार ठरविण्यात येत होते. यावेळी राजस्थानातील सरकार पडण्याचा आरोप सोनिया गांधी या स्वत:वर येऊ देऊ इच्छित नाहीत.