- एस. के. गुप्तानवी दिल्ली - मी पदभार स्वीकारल्यापासून काँग्रेसला बळकट करीत असून, प्रशासनाच्या पातळीवर या आधीच्या कामांना पुढे नेत आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर गेहलोत सोमवारी प्रथमच पीटीआयच्या येथील कार्यालयस्थित ‘लोकमत’ कार्यालयात आले. येथे त्यांनी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी चर्चा केली.गेहलोत म्हणाले, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसला बळकट करीत आहे. त्याचसोबत प्रशासनाच्या दृष्टीने या आधीची कामे पुढे नेण्यासाठी काम करीत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणाबद्दल बोलताना गेहलोत म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत राजकारणात प्रियंका गांधी आल्यामुळे उत्तर प्रदेशमधील कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेस विक्रमी विजयाची नोंद करील. ते म्हणाले की, राजस्थानात गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात दोन-दोन जागा जिंकल्या होत्या. कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या संख्येत निश्चित सुधारणा होईल.गेहलोत यांनी ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्यातैलचित्राला फुले अर्पण करून जुन्या संबंधांना उजाळा दिला.‘लोकमत’ ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आर्यमन देवेंद्र दर्डा यांनी लिहिलेले पुस्तक ‘स्नोफ्लिक्स’ भेट दिले आणि लिटिल प्लॅनेट फाऊंडेशनवर जे काम केले जात आहे त्याची माहिती दिली. या पुस्तकातून जो पैसा मिळेल तो फाऊंडेशनला दिला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी त्यांची निवडणुकांवर रात्री उशिरापर्यंत चर्चा चालली.‘काँग्रेसने देशातील लोकांसाठी काम केले’मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, काँग्रेसने देशातील लोकांसाठी काम केले आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले गेले. यामुळे शेतकऱ्यांच्या घरात आनंद निर्माण झाला व लोकांना हे दिसले की, काँग्रेस पक्षच आपला खरा हित बघणारा आहे. गेहलोत म्हणाले, देशात एकाधिकारशाही (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव त्यांनी घेतले नाही) चालणार नाही. लोकशाही पद्धतीनेच देशाची प्रगती झाली आहे व पुढेही होईल.
प्रियंकांच्या सक्रियतेने कार्यकर्त्यांत उत्साह, अशोक गेहलोत यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 6:48 AM