मंडी : हिमाचल प्रदेशमधील काही जिल्हे भूस्खलनाच्या तडाख्यात सापडले आहेत. अनेकांनी डोळ्यादेखत आपली घरं मातीत मिसळताना पाहिली. आठवडाभरापूर्वीच सुट्टीवर गावी गेलेल्या पोलीस जवानाला देखील याचा प्रत्यय आला अन् त्यानं आपली आपबीती सांगितली. माझ्या डोळ्यासमोर जमीन खचू लागली आणि नंतर माझे तीन मजली घर, नवीन कार जमीनदोस्त झाली, असे हिमाचलचे पोलीस हवालदार अशोक गुलेरिया यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सरकाघाटमध्ये एका माजी सैनिकाचे आणि हिमाचल पोलीस हवालदाराचे तीन मजली घर आणि गाडी भूस्खलनाच्या तडाख्यात आली. संपूर्ण घर कोसळल्याने त्याचं छत्र हरपलं. खरं तर १४ ऑगस्ट रोजी मंडी जिल्ह्यातील सरकार ताटीह इथे अशोक गुलेरिया यांचे घर भूस्खलनात सापडले. घर ढासळत असल्याचा थरार गुलेरिया यांनी पाहिला. पण, ते काहीच करू शकले नाहीत अन् त्यांच्या गाडीसह संपूर्ण घर जमीनदोस्त झाले.
डोळ्यादेखत घर जमीनदोस्त दरम्यान, माजी सैनिक आणि विद्यमान पोलीस हवालदार अशोक गुलेरिया हे सुट्टीसाठी मंडी येथे त्यांच्या गावी गेले होते. ते शिमला इथे तैनात असतात. १७ वर्षांपासून पोलीस विभागात कार्यरत असलेल्या अशोक यांनी सांगितलेला हा थरार हृदयद्रावक आहे. आधी ते सैन्यात होते आणि निवृत्तीनंतर पोलीस खात्यात रुजू झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी तीन मजली घर बांधले असून ते आता नाहीसे झाले आहे. जवानाची व्यथा अशोक यांच्या मुलीचे लग्न झाले असून मुलगा चंदीगड येथे नोकरी करतो. घर आणि गाडी भूस्खलनाच्या तडाख्यात सापडल्याने जवळपास एक कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे ते सांगतात. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणाऱ्या या घराचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.