IAS Officer Transfer : आज शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात प्रसिद्ध IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची महिन्याभरात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. कर्तव्यनिष्ठ असलेल्या तुकाराम मुंडे यांच्या कामासोबतच त्यांच्या बदल्यांची खूप चर्चा होत असते. 2005 मध्ये सनदी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या मुंढे यांची आतापर्यंत 21 वेळा बदली करण्यात आली आहे. पण, देशात सर्वाधिक बदल्यांचा रेकॉर्ड हरियाणातील सनदी अधिकारी अशोक खेमका यांच्या नावे आहे.
महाराष्ट्राततुकाराम मुंढे यांच्याप्रमाणे हरियाणामध्ये IAS अशोक खेमका चर्चेत असणारे सनदी अधिकारी आहेत. गेल्या 30 वर्षात अशोक खेमका यांची ही 55 वेळा बदली जाली आहे. त्यांची अखेरची बदली जानेवारी 2023 मध्ये झाली होती. खेमका सध्या मुख्य सचिव म्हणून अभिलेखागार विभागात काम पाहतात. महाराष्ट्रातील तुकाराम मुंडेप्रमाणे अशोक खेमकादेखील आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात.
कोण आहेत अशोक खेमका?अशोक खेमका 1991 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्याआधी खेमकांनी 1988 मध्ये आयआयटी खरगपूर येथून कंम्प्यूटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर प्रशासकीय सेवेसाठी परिक्षा देऊन ते सनदी अधिकारी बनले. 2012 साली हरियाणामध्ये हुड्डा सरकार असताना सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वॉड्रा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज डीएलएफच्या दरम्यान झालेल्या जमीन व्यवहाराचा करार त्यांनी रद्द केला होता. तेव्हापासून खेमका यांची देशभरात चर्चा झाली. त्यावेळी केंद्रात युपीएचे सरकार आणि हरियाणात देखील काँग्रेच सरकार होते.
तुकाराम मुंढेंची 21 वेळा बदलीमहाराष्ट्रातील अतिशय शिस्तप्रिय सनदी अधिकारी तुकाराम मुंढे सर्वांनाच परिचित आहेत. आपल्या कडक शिस्तीमुळे मुंढे यांचा सत्ताधाऱ्यांसोबत नेहमी संघर्ष होत असतो. यामुळेच त्यांची सातत्याने बदली होत असते. कामासोबतच ते त्यांच्या बदलीसाठीही नेहमी चर्चेत असतात. 2005 मध्ये सेवेत रुजू झाल्यापासून त्यांची आतापर्यंत 21 वेळा बदली झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली, त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या शिस्तीने प्रशासनाला सुतासारखं सरळ केलं आहे.