कल्याण : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय विश्वविद्यालय छत्तीसगडच्या कुलाधिपतीपदी डॉ. अशोक मोडक यांची नियुक्ती केली आहे. शिक्षण क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधनासाठी डॉ. मोडक हे परिचित आहेत. ते मूळचे डोंबिवलीकर आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे डोंबिवलीतील व्यक्तीला कुलाधिपतीचा मान मिळाल्याने मानाचा तुरा डोंबिवलीच्या शिरपेचात खोवला गेला आहे.डॉ. मोडक यांनी १९६३ पासून प्राध्यापक म्हणून काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. टिळकनगर शिक्षण प्रसारक संस्थेचे ते माजी अध्यक्ष आहेत. १९९४ ते २००६ पर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघाचे ते आमदार होते. या कारकिर्दीत त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार राज्य सरकारने दिला होता. प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका सरकार दरबारी व विधिमंडळात मांडली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा होणार आहे.डॉ. मोडक म्हणाले, मला नॅशनल रिसर्च प्रोफेसरपद याआधी मिळाल्याने माझा सन्मान याआधीच झाला. त्या पश्चात राष्ट्रपतींनी पाच वर्षांसाठी कुलाधिपतीपदी केलेली नियुक्ती ही निश्चित आनंदाचा विषय आहे. घटनात्मकदृष्ट्या या पदाला काही अधिकार नसले तरी त्यात जीव ओतून काम करणार आहे. जग झपाट्याने बदलत आहे. भारतीय त्यादृष्टीने सक्षम होत आहेत. कला व वाणिज्य शाखेतून रोजगाराच्या संधी कमी तर, विज्ञान शाखेत त्या संधी अधिक आहे.. त्यामुळे शिक्षण रोजगाराभिमुख करण्यावर भर देण्याचा मानस आहे.
छत्तीसगडच्या कुलाधिपतीपदी अशोक मोडक यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:45 AM