हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 03:17 PM2024-10-05T15:17:37+5:302024-10-05T15:19:08+5:30

Haryana Assembly Election 2024 :हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी खासदार अशोक तंवर यांनी मोठा दावा केला आहे.

Ashok Tanwar claim on Congress seat in Haryana Assembly Election 2024 | हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत

हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा राज्यात आज (५ ऑक्टोबर) विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या ८ ऑक्टोबरला लागणार आहे. हरियाणामध्ये मागील दोन टर्म भाजपचे सरकार राहिलेले आहे. त्यामुळे हॅट्ट्रिक मारण्याची संधी भाजपकडे असून त्यासाठी जोरदार भाजपने प्रयत्न केले आहेत. तर काँग्रेसने देखील हरियाणा विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हरियाणा विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे.

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी खासदार अशोक तंवर यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेस किमान ७५ जागा जिंकेल, असे अशोक तवंर यांनी म्हटले आहे.  अशोक तंवर यांनी सिरसा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, बदलाचे वातावरण दिसत आहे. काँग्रेसला नक्कीच मोठे यश मिळेल. काँग्रेस नेतृत्वाने देशाला एकत्र आणण्याची आणि द्वेष संपवण्याचे भाष्य केले आहे. तसेच, शेतकरी, गरीब, मजूर, नोकरदार...समाजातील ज्यांना गरज आहे, त्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी आहे, असे अशोक तंवर यांनी सांगितले.

पुढे अशोक तंवर म्हणाले, "हे बहुमत त्यांच्या (भाजप) विरोधात आहे, ज्यांना जनादेश मिळाला आणि ते लोकांच्या भावनांसोबत उभे राहिले नाहीत. उत्तर भारताबद्दल बोलायचे झाले तर तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकरी आणि गरीब दलितांमध्येही संताप आहे. हा राग मतदानात दिसून येतो." याचबरोबर, वृत्त वाहिनीशी संवाद साधताना ते म्हणाले, "सर्व टीमचे अंदाज ८ तारखेला समजतील. आज संध्याकाळपर्यंत कोणीही काहीही बोलू शकेल, पण एक्झिट पोल आल्यावर कळेल की काँग्रेस पक्ष ७५ ते ९० जागांवर सरकार स्थापन करणार आहे."

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबरला अशोक तंवर यांनी भाजपला मोठा धक्का दिला होता. त्यांनी  महेंद्रगडच्या रॅलीत भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महेंद्रगडमधील रॅलीत अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर सिरसा मतदारसंघातून अशोक तंवर यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती. परंतु तेव्हा काँग्रेसच्या कुमारी शैलजा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.    

कोण आहेत अशोक तंवर?
अशोक तंवर यांचा काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध आहे. १९९९ मध्ये ते NSUI चे सचिव होते आणि २००३ मध्ये ते अध्यक्ष झाले. २००९ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर सिरसा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. यानंतर अशोक तंवर हे २०१४ ते २०१९ पर्यंत हरियाणा काँग्रेसचे अध्यक्षही होते. मात्र २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. काँग्रेसनंतर अशोक तंवर यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक तंवर यांनी २०१४ मध्ये सिरसा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु काँग्रेसच्या कुमारी शैलजा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

Web Title: Ashok Tanwar claim on Congress seat in Haryana Assembly Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.