नवी दिल्ली : ज्येष्ठ लेखिका व विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या नयनतारा सहगल यांच्यापाठोपाठ ललित कला अकादमीचे अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनीही साहित्य अकादमी पुरस्कार परत करीत वैयक्तिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा निषेध नोंदविला आहे. लेखक आणि विचारवंतांची दिवसाढवळ्या हत्या होत आहे. आम्ही हा पुरस्कार परत करीत त्यांच्या विचारांचे समर्थन करीत आहोत, असे वाजपेयी यांनी म्हटले. दादरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच विवेकवादी लेखक एम.एम. कलबुर्गी आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगल्याबद्दल वाजपेयी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘अनमेकिंग इंडिया’ खुल्या पत्रात सरकारवर आसूड दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची असलेल्या ८८ वर्षीय लेखिका नयनतारा सहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करताना सरकारला ‘अनमेकिंग इंडिया’ या शीषर्काखाली खुले पत्र पाठवत मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह लावले होते. दादरी येथे मोहम्मद इकलाखची गोमांस भक्षण केल्याच्या अफवेवरून जमावाने हत्या केली. कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांची हत्या झाली. अशा घटनांवर मोदी मौन का बाळगून आहेत, असा सवाल नयनतारा यांनी या पत्रात केला होता.साहित्य अकादमीचे राजकारण नको - तिवारीलेखकांनी निषेध नोंदविण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबावा. साहित्य अकादमी ही सरकारी संघटना नसून ते स्वायत्त मंडळ असल्याने तेथे राजकारण आणू नये, असे अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी स्पष्ट केले. ही राष्ट्रीय अकादमी आहे. विविध भाषांमधील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. तेव्हा त्याकडे सन्मान आणि प्रतिष्ठा म्हणून बघितले जाते. अशा स्थितीत लेखक पुरस्कार परत करीत असेल तर त्या सदिच्छेचे काय, असा सवालही त्यांनी केला.लेखक निषेधाशिवाय काय करू शकतात, असा सवाल वाजपेयी यांनी सहगल यांना भक्कम पाठिंबा दर्शविताना केला. १९९४ मध्ये ‘कही नही वही’ या काव्यसंग्रहासाठी वाजपेयी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.देशाच्या मूलभूत तत्त्वांवर हल्ले केले जात आहेत. सहगल या मूळ भारताच्या कल्पनेच्या बाजूने उभ्या ठाकल्या आहेत. त्यांना तिरंगी सलाम.- मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते.
अशोक वाजपेयींनी पुरस्कार परत केला
By admin | Published: October 08, 2015 4:05 AM