नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने (Kanhaiya Kumar) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा एका जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कन्हैया कुमार काँग्रेस पक्षावर खूप टीका करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत चित्रपट निर्मात्याने कन्हैया कुमारची तुलना थेट सरड्याशी केली आहे. "सरड्याचे बदलते रंग" म्हणत निशाणा साधला आहे.
कन्हैया कुमारने जुन्या व्हिडिओमध्ये भारताचा विनाश करण्यासाठी एकटी काँग्रेस पुरेशी होती असं म्हटलं होतं. तर दुसरीकडे आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने "जर काँग्रेस वाचली नाही तर देशही वाचणार नाही" असं म्हटलं आहे. कन्हैया कुमारचा हा व्हिडीओ ट्विटरला शेअर करताना चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashoke Pandit) यांनी ‘सरड्याचे बदलते रंग’ असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी जेव्हा बाहेर काढतील तेव्हा हा भाजपात प्रवेश करू शकतो. आश्चर्य वाटू देऊ नका" असं कन्हैया कुमारवर टीका करताना अशोक पंडित यांनी म्हटलं आहे.
अशोक पंडित यांच्या ट्विटवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. सतीश कुमार नावाच्या एका युजरने "तुम्हाल लाज वाटली पाहिजे. राज्य आणि देशाच तुमचं सरकार असूनदेखील ही व्यक्ती जेलमध्ये नाही. का आपल्या अपयशाचे ढोल वाजवत जगाला सांगत आहात" असं म्हटलं आहे. तर रोहित सिंह नावाच्या एका युजरने अशोक पंडित यांच्या ट्विटवर कमेंट करत म्हटलं आहे की "भाजपातून गेल्यावर काँग्रेस आणि काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर भाजपात जातात. दोघांनी मिळून एकच पक्ष तयार करावा हे बरं होईल." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही'
कन्हैया कुमारने, आपण काँग्रेसमध्ये का सामील झालो हे सांगितले. कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, ते केवळ लोक नाही, तर एक विचार आहे. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथन तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे. कन्हैया म्हणाला, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत.