नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या बदनामी खटल्यात निरर्थक अर्ज करून न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय केल्याप्रकरणी ‘आप’चे ने आशुतोष यांना दिल्लीतील एका न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.या प्रकरणात आशुतोष यांनी भाजपा नेत्यांचा जबाब हिंदीत पुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने म्हटले की, आपच्या या नेत्यांना इंग्रजीत काहीच समस्या नसताना हिंदीचा आग्रह कशासाठी? आशुतोष यांची याबाबतची याचिका फेटाळून लावताना न्यायाधीश दीपक सहरावत यांनी म्हटले आहे की, आशुतोष यांची याचिका सुनावणीला रुळावरून बाजूला करण्याचा प्रयत्न आहे आणि न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय आहे, याशिवाय या याचिकेचा काहीच हेतू दिसत नाही. याचिकाकर्ता किंवा त्यांचे वकील यांना इंग्रजीची समस्या असण्याचे कारण नाही.अरुण जेटली यांनी २०१५ मध्ये आशुतोष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य आप नेते कुमार विश्वास, संजय सिंह, राघव चड्डा आणि दीपक वाजपेयी यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला होता. या नेत्यांनी जेटली यांच्यावर दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निधीत हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. जेटली हे २००० ते २०१३ या काळात असोसिएशनचे अध्यक्ष होते.न्यायालयाने असेही म्हटले की... याचिकाकर्ते हे ‘अण्णा : १३ डेज दॅट अवेकंड इंडिया’या पुस्तकाचे लेखक आहेत. इंग्रजी न्यूज चॅनलवर ते चर्चेत बोलताना दिसतात. हा अर्जही त्यांनी इंग्रजीतूनच दिला आहे. केवळ सुनावणीस उशीर करण्यासाठीच ही याचिका करण्यात आली आहे. त्यामुळे १० हजार रुपयांचा दंड करून ही याचिका फेटाळण्यात येत आहे.
आशुतोष यांना १० हजारांचा दंड, निरर्थक अर्ज करून न्यायालयाच्या वेळेचा केला अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 12:56 AM