नवी दिल्ली : आक्षेपार्ह सीडीवरून हकालपट्टी करण्यात आलेल्या दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांचा बचाव करणारा ब्लॉग लिहिल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आशुतोष यांना समन्स पाठविले आहे.संदीप आणि एक महिला यांच्यातील शरीरसंबंधाची ही सीडी आहे. या दोघांत जे झाले ते संमतीने झाले. त्यामुळे त्यात गैर काही नाही, असे आशुतोष यांनी त्यांच्या ‘ब्लॉग’मध्ये लिहिले होते. या ब्लॉगची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने आशुतोष यांना समन्स पाठवून ८ सप्टेंबर रोजी आयोगासमोर उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आशुतोष यांनी बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीचा बचाव करणारा ब्लॉग लिहिला. त्यांचा हा ब्लॉग दोषयुक्त आणि निम्न पातळीचा आहे. त्यामुळेच त्यांना समन्स बजावल्याचे आयोगाच्या अध्यक्ष ललिता कुमारमंगलम यांनी येथे सांगितले. या प्रकरणाचा फौजदारी तपास सुरू आहे. असे असताना आशुतोष यांनी दोन प्रौढांत संमतीने झालेला व्यवहार असे ठोकून दिले. हे बरोबर नाही.एनडीटीव्ही वेबसाईटवर लिहिलेल्या ब्लॉगमध्ये आशुतोष म्हणतात, या व्हिडिओत एक महिला आणि पुरुषाची शरीरसंबंधाची छायाचित्रे आहेत. या व्हिडिओतून दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या परिचयाचे असल्याचे आणि दूर एकांतात जाऊन परस्परांच्या संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करीत असल्याचे दिसते. मग प्रश्न निर्माण होतो की, दोन प्रौढ व्यक्तींनी संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा आहे काय? (लोकमत न्यूज नेटवर्क)
आशुतोष यांच्या ब्लॉगने गदारोळ
By admin | Published: September 07, 2016 4:32 AM