चंडीगड: पुढील वर्षी अन्य राज्यांसह पंजाब विधानसभा निवडणुकाही (Punjab Election 2022) होत आहेत. सत्ताधारी काँग्रेससाठी आताचा काळ अधिक आव्हानात्मक असून, आगामी निवडणुका काँग्रेसकरिता कठीण असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला असून, थेट काँग्रेसला आव्हान असणार आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठी घोषणा केली आहे. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ११७ जागा लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अश्वानी शर्मा यांनी जाहीर केले आहे.
आगामी काळात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान भाजपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष अश्वानी शर्मा यासंदर्भातील घोषणा केल्याचे सांगितले जात आहे.
भाजप सर्व जागांवर निवडणूक लढवेल
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सर्व जागांवर निवडणूक लढवेल, असे शर्मा यांनी सांगितले. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने ७७ जागा जिंकून राज्यात पूर्ण बहुमत मिळवले होते. १० वर्षांनंतर शिरोमणी अकाली दल-भाजपचे सरकार पडले होते. आम आदमी पक्ष २० जागा जिंकून दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिरोमणी अकाली दल केवळ १५ जागा आणि भाजप ३ जागांवर समाधान मानावे लागले होते.
दरम्यान, भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने झाली. बैठकीच्या पहिल्या सत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण झाले. तर, बैठकीच्या दुसऱ्या सत्रात गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्याचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांद्वारे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विषय मांडण्यात आला. राज्य सरकारकडून पाच वर्षांमध्ये जे काम करण्यात आले, त्याचा मुख्यमंत्र्यांनी लेखाजोखा मांडला.