ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - वर्ष संपताना आयसीसी कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत गोलंदाजांमध्ये भारताच्या रविचंद्रन अश्विनने पहिले स्थान मिळवले आहे तर फलंदाजामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ अव्वल ठरला आहे. अश्विनने कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे.
बिशनसिंग बेदी यांच्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी अश्विनच्या रुपाने भारतीय गोलंदाज आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. १९७३ मध्ये बिशनसिंह बेदींनी आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीमध्ये पहिले स्थान मिळवले होते.
चंद्रशेखर, कपिलदेव आणि अनिल कुंबळे या भारतीय गोलंदाजांना त्यांच्या कारकिर्दीत दुस-या स्थानापर्यंत मजल मारता आली होती.
२००९ पासून आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला यावेळेस मात्र आपले स्थान गमवावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात ४ बळी टिपणा-या स्टेनला दुखापतीमुळे त्याला दुस-या डावात गोलंदाजी करता आली नाही आणि त्याने अव्वल स्थान गमावले.
अश्विनने २०१५ मध्ये नऊ कसोटी सामन्यांमध्ये ६२ गडी बाद केले. वर्षाच्या सुरुवातीला तो १५ व्या स्थानावर होता. यावर्षात अश्विन पाठोपाठ इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने १४ कसोटी सामन्यांमध्ये ५६ विकेट घेतल्या.
आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानापर्यंत पोहोचणे निश्चितच आनंदाची बाब आहे. मला एक दिवस या स्थानापर्यंत पोहोचायचे होते. २०१५ चा शेवट यापेक्षा चांगला असू शकत नाही अशी प्रतिक्रिया अश्विनने दिली.