नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींनी कोरोना लस घेतल्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसकडून टीका केली जात असताना भाजप नेते पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमने उधळत आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी तर पंतप्रधान मोदी हनुमान आणि कोरोना लस म्हणजे संजीवनी असल्याचे म्हटले आहे. (union minister ashwini choubey says pm narendra modi is hanuman and corona vaccine is sanjeevani)
उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे म्हणाले की, कोरोना लसीकरणासंदर्भात विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात होत्या. विरोधकांकडून कोरोना लसींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. भारतातील कोरोना लस प्रभावी नसल्याचे पसरवले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी लस घेणार, असा सवाल वारंवार केला जात असे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेऊन सर्वांना कृतीतून उत्तर दिले आहे, असे अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी सर्वांत आधी कोरोना लस का घेतली नाही; काँग्रेसचा सवाल
पंतप्रधान मोदी म्हणजे हनुमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेऊन संपूर्ण जगाला आश्वस्त केले आहे. ही हनुमानाची संजीवनी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानाप्रमाणे कोरोना लसीची संजीवनी केवळ देशवासीयांना नाही, तर जगालाही देत आहेत, असे कौतुकोद्गार अश्विनी कुमार चौबे यांनी काढले.
पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम लस घ्यायला हवी होती
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन कोरोना लस घेतल्यावरून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांत आधी लस घ्यायला हवी होती. शास्त्रज्ञांनी कोरोना लस सुरक्षित असल्याचे सांगितल्यावर कोरोना लस घेतली. शास्त्रज्ञांच्या समितीने कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित केले होते. आम्ही नाही, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लस घेतल्याचे आम्ही स्वागत करतो, असे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी सकाळी नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. एम्समधील नर्स पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोनाची लस दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे.