बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचं सोमवारी (13 मे) सायंकाळी दिल्लीत निधन झालं. ते कॅन्सरशी लढत होते. आपला सहकारी आणि मित्राची आठवण काढून भाजपा खासदार अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर झाले.
"सुशील कुमार मोदी माझे फक्त मित्रच नाहीत तर भाऊही आहेत, त्यांच्याशी माझे कौटुंबिक नाते आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाने राजकारणात उदयास आलेला माझा भाऊ आज मी गमावला आहे. कधी कधी मी त्यांच्यावर ओरडायचो पण ते रागावायचे नाहीत"
"सुशीलजी हे अतिशय नम्र व्यक्ती होते. सुशीलजी कधीही कोणावर रागावले नाहीत. जेव्हा ते कोणावर रागावायचे, ओरडायचे तेव्हा ते आम्हाला विचारायचे, चौबेजी, आम्ही त्यांना ओरडलो आहोत, त्यामुळे त्यांना राग तर येणार नाही ना? मी कामासाठी ओरडलो असं म्हणायचे" असं अश्विनी कुमार चौबे यांनी म्हटलं आहे.
"पक्षासाठी समर्पणाची भावना"
पाणावलेल्या डोळ्यांनी भाजपा खासदार पुढे म्हणाले की, "सुशील कुमार मोदी यांच्या मनात प्रत्येकाप्रती दानशूरपणाची भावना होती. पक्षाप्रती त्यांचे प्रचंड समर्पण होते. ते एक कॉम्प्युटर होते. जेव्हा कॉम्प्युटर आला तेव्हा सर्वप्रथम त्यांनी संस्थेत जाऊन कॉम्प्युटर कसा वापरायचा याचं शिक्षण घेतलं. कॉम्प्युटरप्रमाणे प्रत्येक डेटा त्यांच्या लक्षात राहायचा."
"राजकारणातील एक कणखर व्यक्तिमत्त्व"
सुशील कुमार मोदींचे वर्णन करताना अश्विनी चौबे म्हणाले की, "मी असे म्हणू शकतो की, ते राजकारणातील एक कणखर व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांना समाजातील प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान होते. आम्ही ते विद्यार्थी आंदोलनात पाहिले आहे, आणीबाणीच्या काळात आमच्यासोबत होते. आजारी असतानाही त्यांनी पुस्तक कधीच सोडलं नाही. ते नेहमीच हसत-खेळत जगायचे."