नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे १६ ते २० जानेवारीदरम्यान होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) वार्षिक बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे करणार नाहीत. तर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि स्मृती इराणी हे देशाचे नेतृत्व करणार आहेत.
वैष्णव हे रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहेत. तर, स्मृती इराणी या महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री आहेत. पीयूष गोयल हे भारत-अमेरिका व्यापार धोरणासंदर्भातील बैठकीसाठी अमेरिकेत आहेत. ते १३ जानेवारीपर्यंत परत येण्याची शक्यता आहे.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) डब्ल्यूईएफमध्ये जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. गोयल यांचे नाव दावोसमधील सहभागींच्या यादीत नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाच दिवसांच्या कालावधीत गुंतवणूक, आरोग्यसेवा, पवन उर्जा, पायाभूत सुविधा, स्टार्टअप, व्यापार, तंत्रज्ञान आदी मुद्द्यांवर विचारमंथन होईल.
महाराष्ट्रातून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशच्या टीमचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या टीममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची शक्यता आहे. इतर केंद्रीय मंत्र्यांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांच्या नावाचा समावेश आहे.