नवी दिल्ली-
रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात दिली जाणारी सवलत आता देणं परवडणारं असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत म्हटलं आहे. यात्री सेवेसाठी गेल्यावर्षी तब्बल ५९,००० कोटी रुपयांची सब्सिडी दिली गेली असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी सभागृहात दिली. यासोबतच सार्वजनिक वाहतूकीतील कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन देखील खूप जास्त असल्याचं स्पष्ट शब्दात अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत पुन्हा केव्हा सुरू जाईल याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावरील उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहासमोर रेल्वेच्या आर्थिक परिस्थिताचा लेखाजोखाच सादर केला. कोविड काळ सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात दिल्या सर्व सवलती बंद करण्यात आल्या होत्या.
अश्विनी वैष्णव म्हणाले, रेल्वे प्रवाशांच्या सेवांसाठी गेल्या वर्षी ५९,००० कोटींची सब्सिडी दिली गेली आहे. जी खूप मोठी आहे. इतकी की देशातील काही राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पाएवढी आहे. रेल्वेचं वार्षिक पेन्शन बिल ६० हजार कोटी रुपये आहे. पगारावर ९७ हजार कोटींचा खर्च केला गेला आहे तर इंधनावर ४० हजार कोटी खर्च केले जात आहेत.
आम्ही गेल्या वर्षी ५९ हजार कोटींची सब्सिडी दिली आहे. नव्या सुविधाही दिल्या आहेत. जर नवे निर्णय घ्यायचे असतील तर सध्या रेल्वेच्या आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रीत करावं लागेल, असंही अश्विनी वैष्णव म्हणाले.
प्रत्येक तिकीटावर ५५ टक्के सवलतकोरोना महामारी आधी रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि अधिस्विकृती धारक पत्रकारांना सूट मिळायची ती सरकार पुन्हा सुरू करणार आहे का?, असा प्रश्न लोकसभा खासदार सुरेश धानोरकर यांनी उपस्थित केला. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी आजही प्रत्येक रेल्वे प्रवाशाला तिकीटात जवळपास ५५ टक्के सूट दिली जात असल्याची माहिती दिली. जर एखाद्या प्रवाशासाठी रेल्वेला १.१६ रुपये प्रवास खर्च येत असेल तर त्यातून फक्त ४० ते ४८ पैसेच प्रवाशाकडून आकारले जातात. गेल्या वर्षी फक्त यात्री सेवा देण्यात एकूण ५९ हजार कोटींची सवलत दिली गेली आहे.
रेल्वेचं दरवर्षी ५ हजार किमीहून अधिक मार्गाचं इलेक्ट्रिफिकेशन केलं जात आहे. तर दरदिवशी १२ किमी लांबीचे नवे रेल्वेरुळ बनवण्यात येत आहे. हाच दर यूपीए सरकारच्या काळात ४ किमी प्रतिदिन इतका होता, असंही वैष्णव म्हणाले.