लखनौ : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गोल्डन गर्ल्स अन्नू राणी आणि पारूल चौधरी यांचा उत्तर प्रदेश सरकारने पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) पद देऊन सन्मान केला. याबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाने घोषणा केली आहे. तसेच या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी तीन कोटी एवढी आर्थिक मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूंना उत्तर प्रदेश सरकार तीन कोटी रूपयांचे बक्षीस देईल. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत अन्नू राणीने भालाफेक स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. याशिवाय अखेरच्या दहा सेकंदात सुवर्ण कामगिरी करणारी धावपटू पारुल चौधरीने देखील इतिहास रचला.
अन्नू राणीने भालाफेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. तिने चौथ्या प्रयत्नात हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करून ६२.९२ मीटर भाला फेकला. हे अंतर एकाही इतर खेळाडूला गाठता आले नाही आणि म्हणूनच अन्नू राणी सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरली. तर, पारूल चौधरीने महिलांच्या ५ हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. सुरूवातीपासूनच पिछाडीवर पडलेल्या पारुल चौधरीने शेवटच्या दहा सेकंदात पूर्ण ताकद पणाला लावली. तिने विरोधी खेळाडूला मागे टाकत सुवर्ण पटकावले. मुख्यमंत्री योगींच्या या घोषणेमुळे खेळाडूंमध्ये विजयाची भावना वाढेल, असे खेळाडूंचे म्हणणे आहे.
योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डीएसपी पदावरील नोकऱ्या आणि प्रत्येकी ३ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत साईटवर करण्यात आलेल्या घोषणेमध्ये योगी यांनी खेळाडूंना लवकरच नियुक्ती पत्र दिली जातील असे म्हटले. मेरठच्या गोल्डन गर्ल्सच्या सन्मानार्थ प्रशासकीय स्तरावरही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, पारुल चौधरीने डीएसपी पदावर नियुक्ती झाल्याची घोषणा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हा एक अनोखा अनुभव असल्याचे ती सांगते. आपल्या सुरुवातीच्या कठीण आणि संघर्षमय दिवसांची आठवण करून देताना पारुल म्हणाली की, माझ्या इथपर्यंतच्या प्रवासादरम्यान मला खूप टीकेला सामोरे जावे लागले. माझ्या गावातील लोक विचारायचे की खेळात करिअर करून तुला काय फायदा होईल? डीएम होणार का? आज त्या सर्व टीकाकारांना उत्तर मिळाले आहे. तसेच आज महिलांनी घराबाहेर पडून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत लोकांच्या मनात असलेल्या शंका संपल्या आहेत. मला माझ्या राज्यात पोलिसांचा गणवेश घालायला मिळेल. हे माझे स्वप्न होते जे आता पूर्ण होईल, असेही तिने यावेळी नमूद केले.