झाशी: भाजपाआमदार जवाहर राजपूत यांच्या मुलाने पोलीस अधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याची घटना उत्तर प्रदेशातील झाशीत घडली. आमदार पुत्राच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. त्याबद्दल पोलीस अधिकाऱ्याने आमदार पुत्राला विचारणा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार पुत्राने पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.
रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती झाशीचे पोलीस अधीक्षक ओ. पी. सिंह यांनी दिली. गुरसराई भागातील मोदी चौकात राहुल राजपूत यांची कार थांबवण्यात आली. नियमित तपासणीचा भाग म्हणून त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रं मागण्यात आली, अशी माहिती या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं दिली. राहुल यांच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यानं त्यांना गाडीची कागदपत्रं दाखवण्याची सूचना केली. त्यामुळे ते संतापले. मी आमदाराचा मुलगा आहे. त्यामुळे हे प्रकरण महागात पडेल, अशी धमकी राहुल यांनी दिल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
राहुल यांनी धमकी दिल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यानं वाहनाची कागदपत्रं मागितली. यानंतर राहुल यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर राहुल यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती समजताच आमदार जवाहर राजपूत त्यांच्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी राहुल यांना मारहाण केल्याचा आरोप केला. माझ्या मुलाला त्रास देणाऱ्या पोलिसाविराधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 'अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची चौकशी ते करत आहेत,' अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दिली.