महागाईवर प्रश्न विचारले; ‘राजा’ने निलंबित केले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:59 AM2022-07-28T06:59:42+5:302022-07-28T07:00:15+5:30
राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका
नवी दिल्ली : महागाई आणि बेरोजगारीवर प्रश्न विचारणाऱ्या २३ संसद सदस्यांना राजाने निलंबित केले, तर ५७ सदस्यांना अटक केली, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, सिलिंडर १०५३ रुपयांना का? दही, धान्यावर जीएसटी का? मोहरीचे तेल २०० रुपये का? लोकशाहीच्या मंदिरातील प्रश्नांची त्यांना भीती वाटते; पण हुकूमशहांशी कसे लढायचे ते चांगले ठाऊक आहे. ईडीकडून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची चौकशी होत आहे. त्याला पक्षाचे संसद सदस्य विरोध करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, महागाई आणि जीएसटीवर चर्चेच्या मागणीवरून गदारोळ करणाऱ्या संसद सदस्यांच्या निलंबनाचा उल्लेख त्यांनी केला.