नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस आणि माकपने ही तक्रार दाखल केली असून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाने मोदींनी मताची मागणी केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर, निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून मोदींच्या भाषणाची व्हीडिओ क्लिप मागवली आहे.
नवमतदारांनो, बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणारे वीर जवान, पुलवामातील शहीद, शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांना पक्की घरे मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातले पहिले मतदान करा, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत एका प्रकारे सैनिकांच्या नावानेच मते मागितली. मोदींनी नवमतदारांना आवाहन करताना चक्क शहीद जवानांचा उल्लेख केला आहे. नवमतदारांनी आपली मत देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करावं, असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीतून मी आपल्यापुढे ही गोष्ट मांडत असल्याचे मोदींनी म्हटले. आपण नेहमी पाहतो किंवा आपली ती संस्कृती आहे, की आपण आपली पहिली कमाई आपल्या आईजवळ ठेवतो. तसेच आपली पहिली कमाई देवापुढे किंवा आपल्या बहिणीकडे सुपूर्द करतो. त्यामुळे जीवनातील आपलं पहिलं ऐतिहासिक मत आपण पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित करणार का ? तुमचं पहिलं मतदान पुलवामामध्ये जे वीर शहीद झाले, त्या शहिदांना तुमचं पहिलं मतदान समर्पित होईल का ? गरिबाला पक्के घर मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे यासाठी तुमचं मत समर्पित होईल का ? असे म्हणत चक्क सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी मते मागितली आहेत. आपलं मतदान हे देशासाठी असेल, असेही मोदींनी म्हटले होते. यावरुन काँग्रेस आणि भाकपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. पण, ते या देशाचे पंतप्रधानही आहेत. मात्र, सातत्याने त्यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. हे उल्लंघन कुठल्या सामान्य व्यक्तीकडून होत नसून देशाच्या पंतप्रधानांकडून होत आहे. पंतप्रधानांना संविधानाचे संरक्षण म्हटले जाते. त्यामुळे निवडणूक आयोगाने या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन मोदींवर कारवाई करावी, असे काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तर, भाकपनेही मोदींनी आपल्या प्रचारात वायूसेनेचा वापर करुन आचारसंहितेचा भंग केल्याचं भाकप पोलिस ब्युरोचे सदस्य निलोत्पल बसु यांनी आयोगाला पत्र लिहून आपली तक्रार दिली.
पहिलं मत वीर जवानांना समर्पित करा; मोदींचं नवमतदारांना 'साकडं'
दरम्यान, मोदींनी महाआघाडीवरून शरद पवारांवर उपरोधिक टोलेबाजी केली. मोदींनी भाषणात दहशतवाद, पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा जाहीरनामा व भाजप सरकारच्या योजनांवर विवेचन केले. पाकिस्तानचे विमान पाडले यावर किती पुरावे द्यायचे? तुमच्या वीर जवानांवर तुम्हाला विश्वास नाही? देशाचे तुकडे करणाऱ्या लोकांना परवाना देण्याचे काँग्रेसचे धोरण आहे. त्यांनी देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा केलीच आहे़, असे मोदी म्हणाले.