जळगाव: असोदा येथील रहिवाशी असलेल्या एका सतरा वर्षीय तरुणीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी योगेश दिगंबर कोल्हे (रा.असोदा) या तरुणाविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी नंदिनीबाई विद्यालयात बारावीच्या वर्गात (कला शाखेत) शिक्षण घेत आहे. असोदा येथून सकाळी अकरा वाजता घरुन बसने रोज जळगावला येते तर संध्याकाळी सहा वाजेच्या बसने घरी परत जाते. सोमवारी ती घरी न आल्याने तिच्या आई व भावाने शोध घेतला. परंतु तिचा शोध लागला नाही. मंगळवारी शाळेत चौकशी केली असता ती प्रॅक्टीकल परीक्षेला आली होती, मात्र नंतर कुठे गेली याची माहिती मिळाली नाही. मात्र गावातीलच योगेश हा तिला रोज शाळेजवळ भेटायला येत असल्याचे समजल्यावर त्याच्या घरी चौकशी केली असता तोही घरातून गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन योगेश कोल्हे याच्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असोद्याचे तरुणीला पळविले
By admin | Published: October 27, 2015 6:40 PM